बीड (वृत्तसंस्था) शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन भागातील एका घरात आगीत होरपळून एका १९ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. प्रकाश विकास डावकर ( वय १९) असे मयत मुलाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, विकास डावकर यांचे शहरात कलरचे दुकान आहेत. रविवारी सकाळी दे दुकानात होते, तर पत्नी व कुटूंबातील इतर सदस्य काही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगरला गेले होते. प्रकाश हा एकटाच घरी होता. सकाळी ११ च्या सुमारास तो कलर दुकानात वडिलांना भेटून घरी गेला. त्यानंतर त्याने गेटला कुलूप लावले, त्याच्या रुममध्ये आतून कडी लावली आणि झोपला होता.
घरात अचानक शॉर्टसर्किट होवून आग लागली. घराचा दरवाजा, खिडक्या बंद असल्याने खिडक्याच्या काचा फुटून मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी या घराकडे धाव घेतली. गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. तर बेडवर मृतावस्थेत प्रकाशचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी अग्निशमन दलासही पाचरण करण्यात आले होते. तसेच शिवाजीनगर ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.