जळगाव (प्रतिनिधी) : मध्यरात्रीच्या सुमारास एका घराच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागून घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील शनिपेठ पोलिस ठाण्याजवळील परिसरात घडली. मनपाच्या अग्निशमन विभागाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली असून याप्रकरणी पोलिसात कुठलेली नोंद करण्यात आलेली नव्हती.
शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यासमोर शेख मेहबूब शेख मोहम्मद हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून त्यांचा फूल विक्रीचा व्यवसाय आहे. शेख मेहबूब शेख मोहम्मद व त्यांचे कुटुंबीय शनिवारी रात्री घरात झोपलेले होते. त्या वेळी मध्यरात्री त्यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. हा प्रकार आजूबाजूच्या रहिवाशांच्या लक्षात येताच आरडाओरड सुरु झाली. बाहेर आवाज ऐकून शेख कुटुंबीयही बाहेर आले. या आगीमध्ये फ्रीज, कुलर, भांडे, कपडे व घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले.
अग्निशमन दलाने मिळवले आगीवर नियंत्रण
घटनेची माहिती अग्नीशमन दलाला देण्यात आली. त्या वेळी दोन बंब घटनास्थळी पोहचले. देविदास सुरवाडे, मयूर ओतारी, योगेश पाटील, ऋषभ सुरवाडे, सौरभ चिकाटे, रोहिदास चौधरी, भगवान पाटील, चेतन सपकाळे, तेजस बडगुजर, गणेश महाजन यांनी आग विझविली. आगीचे नेमके कारण व नुकसानीचा आकडा स्पष्ट झाला नसून याप्रकरणी पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती
















