जळगाव (प्रतिनिधी) भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष आणि प्रहार पक्षाचे विभागीय अध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासोबत एका पार्टीत ‘डान्स करणाऱ्या पाच पोलिसांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. शहर पोलीस ठाण्याच्या या पाच पोलिसांना तडकाफडकी कंट्रोल जमा केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडीओचे वृत्त ‘द क्लिअर न्यूज’ने सर्वप्रथम प्रकाशित केले होते.
या संदर्भात अधिक असे की, शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. सेवानिवृत्ती निमित्त रविवारी दुपारी रेल्वे स्टेशन परिसरात एका मॉलच्या सभागृहात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अनिल चौधरी हे शुभेच्छा देण्यासाठी पोहचताच ‘मैं हू डॉन’ गाणे वाजले. त्यांतर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ‘ओ शेठ तुम्ही नादच केला थेट’ या गाण्यावर अनिल चौधरींसोबत ठेका धरला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबतचे वृत्त ‘द क्लिअर न्यूज’ सर्वप्रथम प्रकाशित केले. त्यानंतर कारवाईची सूत्र हलायला लागली. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय येरुळे यांना तोंडी आदेश देऊन पाचही पोलिसांना कंट्रोल रूम जमा केले.
या पोलिसांवर झाली कारवाई
कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये सहायक फौजदार केदार, हवालदार विजय निकुंभ, प्रफुल्ल धांडे, योगेश पाटील व गणेश पाटील यांचा समावेश आहे.