चोपडा (प्रतिनधी) दोन मुलींच्या पाठीवर जन्मलेल्या पाच वर्षीय चिमुकल्या बाळाचा कूलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी बिडगाव येथे घडली. सोहेल जावेद तडवी (५) असे मृत मुलाचे नाव आहे. दरम्यान, आई-वडिलांचा मन सुन्न करणारा आक्रोश बघून अनेकांचे डोळे पाणावले होते.
जावेद तडवी यांना दोन मुलींच्या पाठीवर मुलगा झाला होता. सोहेल, दोन मुली, पत्नी, आई वडिलांसह जावेद यांचे कुटुंब राहते. गुरुवारी सायंकाळी सोहेल हा जवळील दोन लहान मुलांसोबत खेळत होता. ती तिन्ही मुले जवळच मुजात महारू तडवी यांच्या घरात गेली. तेथे पत्री कुलर लावलेले होते. त्यात वीज प्रवाह उतरलेला होता. त्या कुलरला सोहेलचा धक्का लागल्यामुळे तो जोरात फेकला गेला. त्याला आधी धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून रुग्णवाहिकेतून चोपडा येथे खासगी हॉस्पिटलला नेण्यात आले. परंतू तेथील डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. उपजिल्हा रुग्णालयात त्याचे शेवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताच आई वडीलांनी हंबरडा फोडत मोठा आक्रोश केला. दरम्यान, खेळता खेळता एकुलता एक मुलगा गेल्याने आई-वडिलांचा मन सुन्न करणारा आक्रोश बघून उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी आले होते.