वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरने मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेच्या संसदेला घेराव घालत ट्रम्प समर्थकांनी प्रचंड धुडगूस घातला. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी केलेल्या भयंकर हिंसाचारानंतर ट्विटरने ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत हिंसाचाराच्या झालेल्या उद्रेकानंतर आणि भविष्यातही हिंसेला चिथावणी देण्याची भीती व्यक्त करत ट्विटरने ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट बंद केलं आहे.
ट्विटरने भविष्यातही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्ये, दंगली केल्या जाण्याची शक्यता व्यक्त करत त्यांचे ट्विटर खाते कायमस्वरुपी बंद केले आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी गेल्या गुरुवारी अमेरिकेची संसद कॅपिटॉल बिल्डींगमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केली होती. या हिंसाचारात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर ट्विटरने हा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेत अडथळा आणण्याच्या उद्देशाने मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी ‘कॅपिटल’ या संसदेच्या इमारतीमध्ये धुडगूस घातला. ट्रम्प समर्थकांनी संसदेत शिरत प्रचंड हिंसाचार घडवून आणला. या घटनेनंतर ट्विटरने ट्रम्प यांचे काही ट्विट्स डिलीट केले होते. त्याचबरोबर अकाऊंटही तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर ट्विटरने ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही कालावधीत केलेले ट्विट आणि त्यांच्या संदर्भाची समीक्षा केल्यानंतर त्यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंसा आणखी भडकावण्याची शक्यता असून, ही कारवाई करण्यात येत असल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हल्ला चढविल्यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई करण्याबाबत विचार सुरू आहे. ट्रम्प यांना राष्ट्रध्यक्षपदावरून तातडीने हटविण्याबाबत सर्व कायदेशीर मार्गांचा विचार करण्यात येत आहे. तसे न झाल्यास त्यांच्यावर महाभियोग चालविण्याचा इशाराही प्रतिनिधी सभेने दिला आहे. तर दुसरीकडे अध्यक्षीय अधिकारांचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प हे स्वत:ला माफ करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.