यवतमाळ (वृत्तसंस्था) गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील घरी दाखल झाले आहेत. संजय राठोड आज पोहरादेवी मंदिरात जाणार आहेत. संजय राठोड हे साडेअकरा वाजता पोहरादेवीला जातील. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अडचणीत सापडलेले संजय राठोड आज मौन सोडणार का? या प्रकरणावर ते नेमकं काय बोलणार, काय भूमिका मांडणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.
संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज, जगदंबा मातेचं दर्शन घेतल्यावर ते दुपारी १ वाजता दारव्हा तालुक्यातील धामनगाव देव इथल्या श्रीक्षेत्र मुंगसाजी महाराज संस्थानकडे निघतील. दुपारी अडीच वाजता मुंगसाजी महाराज देवस्थानात दर्शन घेतल्यावर ते साडेचार वाजता यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतील. त्यानंतर यवतमाळ निवासस्थानी थांबतील. तसेच पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड हे नेमकी काय भूमिका मांडतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. संजय राठोड आज पोहरागडावर दाखल होणार आहेत. संजय राठोड कुठे आहेत आणि कसा असेल त्यांचा आजचा दौरा याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण?
मूळची बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून ७ फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी ती पुण्यात राहात होती. तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने तक्रार दाखल केली. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. त्यातच पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल १२ ऑडिओ क्लिप समोर आल्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज वनमंत्री संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.