चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहरात भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर काल मध्यरात्री धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, रात्री साधारण १२ वाजेच्या सुमारास वैष्णवी साडी सेंटर जवळ ही धक्कादायक घटना घडली. प्रभाकर चौधरी हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना स्विफ्ट कारमधून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची दुचाकी अडवली आणि थेट धारदार कोयत्याने त्यांच्यावर वार केले. या हल्ल्यात चौधरी यांना मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. त्यामुळे या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हल्लेखोरांचा शोध सुरू
घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाले असून, रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विविध भागांमध्ये पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला जुन्या वादातून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.