नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अटल सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परदेश मंत्री म्हणून जबाबदारी हाताळणाऱ्या यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसची वाट धरलीय. शनिवारी दुपारी यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर यशवंत सिन्हा दीर्घकाळापासून सक्रीय राजकारणातून दूर होते.
भारतीय जनता पक्षाचे माजी नेते आणि केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. शनिवारी सकाळी यशवंत सिन्हा कोलकाताला दाखल झाले. इथे त्यांनी तृणमूल काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांच्याकडून दिनेश त्रिवेदी यांच्या जागेवर यशवंत सिन्हा यांना राज्यसभेत धाडलं जाऊ शकतं. ‘ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये जो हल्ला झाला. तो टिपिंग पॉईंट होता. तेव्हाच मी तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा आणि ममतांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला’, असं स्पष्टीकरण यशवंत सिन्हा यांनी दिलं.
















