पुणे (वृत्तसंस्था) माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं निधन झालं आहे. पुण्यात राहत्या घरी सकाळी साडे नऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९१ वर्षांचे होते. मंगळवारी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील पहिली एल्गार परिषद पी. बी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. पी. बी. सावंत यांचं आज (सोमवार १५ फेब्रुवारी) सकाळी साडेनऊ वाजता निधन झालं. उद्या सकाळी पुण्यातील बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पी. बी. सावंत यांची अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती म्हणून ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचा निकाल लागला.
पी. बी. सावंत यांची कारकीर्द
पी. बी. सावंत यांचा जन्म ३० जून १९३० रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएलबी) मिळवल्यानंतर पी. बी. सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली म्हणून सराव सुरु केला. १९७३ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्याच्या उल्लेखनीय कामांपैकी एक म्हणजे जून १९८२ मधील एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी. १९८९ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आले. १९९५ मध्ये ते निवृत्त झाले.
पी. बी. सावंत यांच्या नेतृत्वात आयोग
एक सप्टेंबर २००३ रोजी तत्कालीन महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाचे पी. बी. सावंत अध्यक्ष होते. त्यांनी २३ फेब्रुवारी २००५ रोजी आपला अहवाल सादर केला, ज्यात नवाब मलिक, पद्मसिंह पाटील आणि सुरेश जैन यांच्यावर आरोप होते, परंतु विजयकुमार गावित यांना दोषमुक्त केले गेले. यामुळे दोन कॅबिनेट मंत्री सुरेश जैन आणि नवाब मलिक यांनी राजीनामा दिला.
बिनखर्चाची निवडणूक व्हावी असं परखड मत
निवडणूक बिनखर्चाची व्हावी आणि सेवाभावी कार्यकर्ते संसदेत असावेत असं पी. बी. सावंत यांचं मत होतं. “कोटय़वधींचा खर्च केल्याखेरीज निवडणूक जिंकता येत नाही हे सध्याचे वास्तव आहे. त्यामुळे अनेक जण निवडणुकीच्या खर्चाकडे गुंतवणूक म्हणूनच पाहतात. या निवडणूक पद्धतीमध्ये बदल घडून ती बिनखर्चाची व्हावी आणि सेवाभावी वृत्तीचे कार्यकर्ते संसदेमध्ये प्रतिनिधी असावेत,” असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.