भुसावळ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवार जाहीर केल्यानंतर मविआचे घोडे अद्यापही जागा वाटपाअभावी अडल्याचे चित्र आहे. अशातच रावेरच्या जागेवर खडसे परीवारातील सदस्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर या जागेवर आत भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींना संधी मिळण्याचे संकेत आहे. भुसावळात माजी आमदार चौधरींना संकेत मिळणार असल्याचे वृत्त धडकताच चौधरी समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून जल्लोष केला. दरम्यान, चौधरी यांच्या नावाची अद्याप अधिकृतरीत्या घोषणा झाली नसलीतरी चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवार, 19 रोजी माजी आमदार चौधरी शहरात दाखल होणार असून ते आल्यानंतर अनेक बाबींचा उलगडा होणार आहे.
तर माजी आमदार चौधरी उमेदवार
रावेर लोकसभेसाठी खासदार रक्षा खडसे यांना तिसर्यांदा भाजपाने संधी दिल्यानंतर मविआकडून मात्र या जागेवर अद्यापही उमेदवार निश्चित झालेला नाही. आमदार एकनाथराव खडसे यांनी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढवण्यास स्पष्टपणे नकार दिला तर दुसरीकड अॅड.रोहिणी खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार देत आपण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता मविआकडून तुल्यबळ उमेदवार म्हणून भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्याकडे पाहिले जात आहे. शरद पवार यांनी चौधरी यांना बोलावत त्यांच्याशी याबाबत चर्चादेखील केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उमेदवारीचे संकेत अन् भुसावळात जल्लोष
रावेर लोकसभेची निवडणूक भाजपासाठी सोपी ठरू नये यासाठी राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. तुल्यबळ उमेदवार म्हणून भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्याकडे पाहिले जात आहे. चौधरी यांच्या नावाबाबत अधिकृतरीत्या घोषणा झाली नसलीतरी शरद पवारांकडून चौधरी यांना कामाला लागण्याचे संकेत मिळाल्याचे वृत्त भुसावळात धडकताच सोमवारी दुपारी चौधरींच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजीदेखील करीत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांना पेढेही भरवण्यात आले.
चौधरी समर्थकांमध्ये आनंदाची लहर
राष्ट्रवादीकडून चौधरींना उमेदवारी मिळाल्यास रावेरची लढत अत्यंत चुरशीची होईल यात शंकाच नाही. राष्ट्रवादीतून अनेक नेत्यांनी चौधरींच्या नावाला सकारात्मक दर्शवली आहे. कुठल्याही पंरीस्थितीत हा जागा खेचून आणण्याचा चंग राष्ट्रवादीतील निष्ठावान नेत्यांनी बांधला आहे. उमेदवारीबाबत नेमकी अधिकृत घोषणा झाल्यानंतर रावेरच्या जागेबाबत अधिकृतरीत्या कळणार असलेतरी चौधरी समर्थकांना मात्र संतोष चौधरींनाच संधी मिळणार असल्याचा अंदाज आल्याने त्यांच्यात आनंदाची लहर पसरली आहे. मंगळवारी माजी आमदार चौधरी शहरात परतणार असल्याने त्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होवू शकणार आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीदेखील संतोष चौधरी यांनाच संधी मिळणार असल्याचे वृत्त दिले आहे.