चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाचे नेते, गोरगावलेचे माजी सरपंच, मार्केट कमेटीचे माजी संचालक व भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात अर्थ व आरोग्य मंत्री ना. हरीश राव व अन्नपुरवठा मंत्री ना. रवींदरसिंग यांच्या शुभहस्ते प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम, वरिष्ठ नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे पाटील, नासिक विभाग प्रमुख नानासाहेब बच्छाव, धुळे नंदुरबारचे समन्वयक ॲड. अविनाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हैद्राबाद येथे भारत राष्ट्र समिती (बीआरएस) मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी श्री.बाविस्कर यांनी ना. हरिश राव यांचा खान्देशी टोपी शाल गुच्छ देऊन सत्कार केला. लवकरच त्यांना पुढिल बैठकीसाठी हैद्राबाद येथे बोलाविण्यात येणार आहे, अशी माहिती जगन्नाथ बाविस्कर यांनी दिली आहे.
मागील २५/३० वर्षांपासून जगन्नाथ बाविस्कर यांनी भाजपसेनेला कोळी समाजाची खंबीर साथ देतांना वेळोवेळी युतीचे नेते, आमदार, खासदार, मंत्री यांना कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी विनवण्याही केलेल्या आहेत. परंतु युती व आघाडी तसेच सध्याची तिघाडी यांनी कोळी समाजाच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. श्री.बाविस्कर यांनी मे महिन्यात कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळावेत यासाठी अमळनेर येथील प्रांत कार्यालयासमोर तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करून शेकडों दाखले मिळवुन दिले होते. त्यावेळेसही सत्ताधारी युतीच्या नेत्यांना निवेदने दिलेली असतांना त्यांनी साधी विचारपूसही केली नाही. आपण तनमनधन लावून पक्षवाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करीत असताना आपल्या समाजाला न्याय मिळत नसेल तर असे पक्ष व नेत्यांसोबत राहायचेच कशाला ? म्हणूनच त्यांनी आपल्या परिवारातील सदस्य, नातेवाईक, कोळी समाजबांधव, सर्व जातीधर्मातील स्नेहीप्रेमी व सहकारी मित्रमंडळी यांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घेऊन भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश घेतला असल्याचे श्री.बाविस्कर यांनी सांगीतले आहे.
याप्रसंगी जळगावचे समन्वयक देवेंद्र वराडे, धुळ्याचे उपजिल्हाप्रमुख विठ्ठल पाटील, चोपड्याचे समन्वयक समाधान बाविस्कर, शिंदखेड्याचे विठ्ठल नगराळे, शिरपूरचे ओंकारराव जाधव, नारायण पवार, विनोद पाटील,जामनेरचे विनोद तवर यांची विशेष उपस्थिती होती. चोपडा अध्यक्ष दीपक पाटील, महिला अध्यक्ष कोमल पाटील, युवाध्यक्ष अनिल कोळी व बीआरएसचे सर्वच कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
विठ्ठला..कोणता झेंडा घेऊ हाती ?
शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज व पाणी देणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री व बीआरएसचे राष्ट्रीय अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांनी आषाढीला महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीक्षेत्र,पंढरपूर येथील श्रीविठूमाऊलींच्या चरणी आपल्या जनतेसाठी प्रार्थना केली आहे. सध्या महाराष्ट्रात युती व आघाडीची बिघाडी झाल्याने जनता जनार्दन यांच्या मूळ प्रश्नांकडे राज्यकर्त्यांचे अक्षम्यं दुर्लक्ष झालेले आहे. केसीआर महाराष्ट्राला विकासाचे मॉडेल बनविण्याचा प्रयत्न करणार आहेत. म्हणूनच मी भाजपाचा राजीनामा देऊन विठ्ठलसाक्षी भारासचा झेंडा हाती घेतलेला आहे. मी आपणांसर्वांना बीआरएसच्या फ्रंटलाईनमध्ये येण्याचे आवाहन करित आहे.
– जगन्नाथ बाविस्कर, सदस्य, भारत राष्ट्र समिती, चोपडा