हैदराबाद (वृत्तसंस्था) लाच घेतल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या एका माजी तहसीलदाराने आज येथील मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे.
बलराजू नागराजू असे या माजी तहसीलदाराचे नाव असून तो 47 वर्षांचा होता. लाचलुचपत विभागाने त्याला 1 कोटी 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्याला चंचलगुडा येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. कोठडीच्या खिडकीच्या गजाला फास घेऊन त्याने आत्महत्या केली. लाचलुचपत विभागाने चौकशीसाठी त्याची तीन दिवसांची कोठडी मागितली होती. त्यामुळे त्याचा ताबा ऍन्टी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला होता व त्यांनीच त्याला या मध्यवर्ती कारागृहात ठेवले होते. त्याने कोठडीच्या बेडशीटचा फास करून त्याद्वारे ही आत्महत्या केली.