नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी केंद्रीय मंत्री दिलीप राय यांना 1999 सालच्या कोळसा घोटाळ्याप्रकरणी तीन वर्षाच्या कारावासची शिक्षा सुनावली आहे. दिलीप राय यांच्यासह अन्य दोन व्यक्तींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भारत पराशर यांनी निर्णय दिला.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री असताना दिलीप राय यांनी 1999 साली झारखंड मधील कोळसा खाणीचे परवाने देताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. राय यांच्या खेरीज कोळसा मंत्रालयातील तत्कालिन वरिष्ठ अधिकारी प्रदीपकुमार बॅनर्जी आणि नित्यानंद गौतम तसेच कॅस्ट्रॉन टेक्नॉलॉजिसचे संचालक महेंद्रकुमार आगरवाल हे या प्रकरणात आरोपी आहेत. न्यायालयाने सीटीएल 60 लाख रुपये तर सीएमएलला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
समाजात व्हाईट कॉलर भ्रष्टाचार वाढत चालला असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी यातील आरोपींना सक्त सजा देणे गरजेचे आहे. यामुळे आरोपींना जन्मठेपच ठोठावण्यात यावी, असे आग्रही प्रतिपादन सीबीआयच्या वतीने न्यायालयात करण्यात आले होते. या प्रकरणात दिलीप राय यांना विविध कलमांखाली दोषी ठरवण्यात आले आहे. ज्या कलमांखाली राय यांना दोषी ठरवण्यात आले आहे त्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. परंतु, आरोपींचे आता वय झाले आहे. त्यामुळे त्यांचा सहानुभूतीने विचार करून त्यांना कमीतकमी शिक्षा देण्याची विनंती आरोपींच्या वतीने त्यांच्या वकिलांनी केली होती.
दरम्यान, कोळसा घोटाळा प्रकरणात अशा कलमांखाली दोषी ठरलेले राय हे पहिलेच माजी केंद्रीय मंत्री आहेत.