चोपडा (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील हातेड-गलंगी रस्त्यावरील युग पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत एक मोठा अनर्थ टाळला असून आरोपींकडून सुमारे ३ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २८ मे २०२५ रोजी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास, हातेड बुद्रुक गावाच्या हद्दीतील युग पेट्रोल पंपाजवळ चार जण संशयास्पद हालचाली करताना आढळून आले. ही माहिती मिळताच चोपडा ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चौघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी पकडलेल्या सोनू चक्कर चव्हाण (वय २५), यशवंत निराधार पवार (वय ४२), धर्माचिमन भोसले (वय ४०), भरत निराधार पवार (वय ३८) सर्व राहणार – जामदे, तालुका साखरे, जिल्हा धुळे यांच्याकडून लाल मिरची पूड २४५ ग्रॅम व २५० ग्रॅम, पिवळ्या धातूच्या १९ पट्ट्या, काळ्या रंगाची बॅग मोबाईल फोन्स ( रियलमी १४ प्रो, विवो २९०, ओपो A3X, मोटोरोला Edge 50, मोटारसायकली ( केटीएम लाल रंग, क्र. MH 18 CD 8871, होंडा युनिकॉन क्र. MH 18 BU 64) मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण किंमत ₹३,२३,००० इतकी आहे.
पोलिसांची तत्पर कारवाई
या चौघांकडून मोठा दरोडा टाकण्याची तयारी सुरू होती. मात्र पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे गंभीर गुन्हा टळला आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा क्रमांक १६९/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता (बीएनएस) कलम ३१० (४) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांचे मार्गदर्शन व तपास
घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप व पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नितनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
















