वर्धा (वृत्तसंस्था) शेतशिवारात रात्रीदरम्यान ससे पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा शेताच्या कुंपणावरील विद्युत प्रवाहित वाहिनीला स्पर्श होताच घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेत दोघे बचावले असून घटना शुक्रवारच्या रात्री घडली. उत्तम संभा जांभुळे (५०), अखिल वासुदेव बावणे (२२, दोन्ही रा. गिरड) अशी मृतकांची नावे आहे. तर बादल खडसे, विकास नन्नवरे हे दोघे थोडक्यात बचावले.
मृतकाचे नाव उत्तम संभाजी जांभुळे (५५) आणि अखिल वासुदेव बावणे (२२) असे आहे. दोघेही गिरड येथील रहिवासी असून याप्रकरणी शेतमालक अनिल गौरकर (५४) रा. गिरड यांच्यावर गिरड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जंगली जनावरांपासून शेतातील पिकांचे संरक्षण करण्याकरिता आरोपीने शेताच्या बांधावर बांधून त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडला होता. गिरड गावातील उत्तम जांभुळे त्यांचे शेजारी राहणारे अखिल बावणे, विकास नन्नावरे आणि बादल खडसे हे गिरड पेवटा शिवारात शेतकरी अनिल गौरकर यांच्या शेतात सशांची शिकार करण्याकरिता शिकारीचे जाळे व टॉर्च घेऊन रात्री ९ वाजेच्या सुमारास गेले होते.
शेतकरी अनिल गौरकर यांनी पिकाच्या रक्षणाकरिता कुंपणावर कार्यान्वित केलेल्या विद्युत प्रवाहाची त्यांना कल्पना नव्हती. शेतात अंधार असल्याने शिकारीकरिता गेलेल्या उत्तम जांभुळे व अखिल बावणे यांना वीजप्रवाह कार्यान्वित असलेली तार दिसली नाही. दोघांच्याही पायाचा त्या ताराला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. त्यांच्यामागे काही अंतरावर उभे असलेले त्यांचे सहकारी विकास व बादल यांना घटना लक्षात येताच त्यांनी शेताजवळच्या डीपीमधील विद्युत प्रवाह बंद केला.
गाव गाठून त्यांच्या नातेवाईकांना व पोलिसांना घटनेची माहिती दिली. विद्युत प्रवाहीत तारेला मृतकांचे पाय चिकटून असल्याचे चित्र घटनास्थळावर पोहोचलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र गिरड येथे नेले असता वैद्यकीय अधिक डॉ. गुजर यांनी मृत घोषित केले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.
दरम्यान, अनिल गौरकर याने शेतासभोवताल तारेच्या कुंपणाला वीजप्रवाह सोडला होता. वीजप्रवाहित तारेने मनुष्यहानी होण्याची शक्यता असल्याची जाणीव असतानाही त्याने तारेच्या कुंपणाला वीजप्रवाह जोडल्याने दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी शेत मालक अनिल गौरकर याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत.