वाळूज महानगर (वृत्तसंस्था) पोहण्यास गेलेल्या चार शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे गुरुवारी (दि.११) सायंकाळी सात वाजता उघडकीस आली. मृतात दोन सख्खे भाऊ असून ते दोन मित्रांसोबत तलावात पोहायला गेले होते. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास या चौघांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. मृतदेह बघताच आई-वडिलांनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता.
तलावाच्या काठावर कपडे व मोबाइल आढळले !
वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील दत्तनगरात राहणारे बिश्वजीतकुमार सुखदेव उपाध्याय (१२), अबरार जावेद शेख (१२), अफरोज जावेद शेख (१४) व एक १४ वर्षीय अनोळखी असे चार जण गुरुवारी दुपारी गावाजवळील बनकरवाडी पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र बराच वेळ झाला तरी मुले घरी आली नसल्याने पालकाने परिसरात विचारपूस केली. ही सर्व मुले पाझर तलावाकडे गेली असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तलावाच्या काठावर कपडे व मोबाइल दिसून आले. ते पालकांनी ओळखल्याने मुले बुडाल्याची खात्री झाली.
दोन सख्ख्या भावांचा मृत्यू !
बिश्वजितकुमार रांजणगावातील अफरोज शेख व अबरार शेख या दोन सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने शेख ब कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तलावात या दोघा भावांना बाहेर काढले त्यावेळी नातेवाइकांच्या आक्रोशाने उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. मयत अफरोज हा वाळूज्ञला मदरशामध्ये, तर त्याचा लहान भाऊ अबरार हा रांजणगावातील साईराम इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.