नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलाविली होती. या बैठकीतनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊन देखील, लॉकडाऊन केले जाणार नाही, असे संकेत अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.
दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे चिंता वाढू लागली होती. तसेच, पुन्हा लॉकडाऊन लागू केला जातोय की काय, अशी भिती देखील दिल्लीकरांना वाटू लागली होती. मात्र, दिल्लीत लॉकडाऊन लागू करणार नाही, असं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे. पुन्हा लॉकडाऊन जरी लागू केला जात नसला, तरी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना कळकळीचं आवाहन केलं आहे. “माझं दिल्लीकरांना हात जोडून आवाहन आहे की कृपया त्यांनी मास्क घालावेत”, असं केजरीवाल म्हणाले आहेत. दरम्यान, दिल्लीमध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असल्याचं मुख्यमंत्र्यांना यावेळी नमूद केलं. “दिल्लीमध्ये सध्या वाढत असलेली रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. पण सध्याची कोरोनाची लाट ही याआधीच्या लाटेपेक्षा कमी तीव्रतेची आहे. ऑक्टोबर २०२०पेक्षा सध्या आयसीयूमध्ये कमी रुग्ण आहेत. तेव्हा दिवसाला ४० मृत्यूंची नोंद होत होती, आता तो आकडा १० पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याऐवजी सरकार रुग्णालयांमधील आरोग्यसुविधा अधिक वाढवण्यावर आणि सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढवण्यावर सरकारचा भर आहे”, असं देखील केजरीवाल यांनी सांगितलं आहे.
सर्वच वयोगटातल्या नागरिकांना लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारने द्यावी, अशी मागणी यावेळी केजरीवाल यांनी केली आहे. “जर मंजुरी देण्यात आलेल्या व्हॅक्सिन सुरक्षित असतील आणि केंद्र सरकारने सगळ्यांना लसीकरण करण्याची परवानगी दिली, तर आम्ही युद्धपातळीवर दिल्लीत हजारो लसीकरण केंद्र उभारू शकतो. कोरोना नियंत्रित करण्यासाठी याचा फायदा होईल”, असं देखील केजरीवाल यांनी नमूद केलं आहे.
दिल्लीमध्ये दिवसभरात ३ हजार ५९४ नवे करोनाबाधित सापडले असून १४ रुग्णांचा Covid १९ मुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीत आजपर्यंत सापडलेल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६ लाख ६८ हजार ८१४ इतका झाला आहे.