जळगाव (प्रतिनिधी) जळगाव सायबर पोलिसांनी राजस्थानातून दोन भामट्यांना अटक केली आहे. आरोपींनी जळगावात जिल्ह्यात तब्बल सव्वादोन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. उच्चशिक्षीत प्राध्यापिका, डॉक्टर, शिक्षक व व्यावसायिकांना आरोपींनी शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास त्यात जादा नफा मिळेल, या आमिषाने गंडवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
टोळीतील क्रिप्टो करन्सी वॉलेट वापरणारा मोहम्मद इस्राइल याला दिल्लीतील कपासहेडा येथून तर बँकेचे करंट खाते कमिशनवर देणारा अनिल कुमार याला बाडमेर (राजस्थान) येथून अटक करण्यात आली. सायबर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार प्रवीण वाघ, राजेश चौधरी, दिलीप चिंचोले, दीपक सोनवणे आदींनी ही कारवाई केली. दरम्यान, आरोपींनी अन्य साथीदारांची नावे सांगितली असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.