पाचोरा (प्रतिनिधी) नमकीन वेफर्स कंपनीच्या व्यापाऱ्याची पाचोऱ्याच्या भामट्याकडून दीड लाखाची फसवणूक झाल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मधुर मिलन फ्रुट प्रॉडक्ट प्रा. लि. कंपनी कायगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर या कंपनीचे व्यवस्थापक संभाजी सयाजी गिलबिले ह्या व्यवस्थापकास पाचोरा येथून दि. २ ऑक्टो रोजी जब्बार शेख रा. पाचोरा याने मोबाईलवरून सदर कंपनीच्या वेफर्स आणि नमकीन साठी फोनवर ऑर्डर केली ८०० किलो वेफर्स व ३०० किलो नमकीन पार्सल पाचोरा येथील जारगाव चौफुली येथे तातडीने पाठवा, असे सांगून सदर कंपनी व्यवस्थापकास विश्वासात घेतले.
सदर कंपनी व्यवस्थापकाने संपूर्ण माल एकूण रुपये एक लाख ५२ हजार पाचशे किमतीचा कंपनीच्या गाडीने गाडी चालक आखेसिंग सोह्यासिंग याचे जबाबदारीने पाचोरा येथे रवाना केला. दि. ३ रोजी जारगाव चौफुलीवर जब्बार शेख यास संपर्क साधून त्याचे ताब्यात दिला. जब्बार शेख याने त्याच्या छोटा हत्ती गाडीमध्ये उतरवून सदर गाडी परस्पर रवाना केली. यावेळी कंपनीच्या गाडी चालकास पाचोरा येथील जारगाव चौफुलीवर थांबवून ठेवले.
सदर कंपनीच्या व्यवस्थापकाने चालकास संपर्क केला असता जब्बार शेख याने माल उतरवून घेतला व परस्पर त्याच्या छोटा हत्ती गाडीने घेऊन गेला असून त्याने पैसे दिले नाहीत व संपर्क होत नाही, असे सांगितले. यावरून कंपनीची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणी कंपनी व्यवस्थापक संभाजी गिलबिले यांनी पाचोरा पोलिसात येऊन जब्बार शेख व कंपनीच्या गाडी चालकाविरुद्ध सदर मालाची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केल्याची फिर्याद दिली. यावरून पाचोऱ्याच्या त्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.