जळगाव (प्रतिनिधी) प्रांत अधिकारी यांनी चुकीचे निर्णय दिलेले आहे. नाशिक येथील महसूल आयुक्तांसोबत आमची ओळख असून निकाल तुमच्याकडून लावण्यासाठी दिवाणी न्यायालयात खटल्याच्या कामकाजासाठी कविता राजेंद्र पाटील (वय ४४, रा. मुंबई, ह. मु. नेरी, ता. जामनेर) यांच्याकडून वेळोवेळी ९२ हजार रुपये घेवून त्यांची फसवणुक केली. ही घटना दि. ३० नोव्हेंबर ते दि. ६ डिसेंबर रोजी दरम्यान, घडली. याप्रकरणी पुनम अशोक पाटील व सोहम मिलींद जोशी यांच्याविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील कविता राजेंद्र पाटील (वय ४४) या हल्ली जामनेर तालुक्यातील नेरी येथील धान्य मार्केटजवळ वास्तव्यास आहे. त्यांची जळगावातील दिवाणी न्यायालयात तारीख असल्याने त्या आई, वहिनी यांच्यासोबत दि. ३० नोव्हेंबर रोजी न्यायालयात आल्या होत्या. यावेळी एक महिला आणि पुरुष त्यांच्याजवळ येवून त्यांच्यासोबत बोलू लागले. त्यांनी त्यांचे नाव पूनम पाटील व सोहम जोशी असे सांगत तुम्ही कशासाठी आले आहे अशी विचारणा केली. त्यावर कविता पाटील यांनी आमची दिवाणी स्वरुपाची शेती संदर्भात वाद सुरु असून त्याची तारीख असल्याने त्यासाठी आम्ही याठिकाणी आलो असल्याचे त्यांना सांगितले. त्यावेळी त्या दोघांनी त्यांची फाईल बघून माझी नाशिक येथे ओळख असून मी तुमचे काम करुन देईल असे म्हणत, त्यांनी ५ हजार रुपये त्यांच्याकडून घेतले होते.
आठ दिवसानंतर पूमन पाटील या महिलेने कविता पाटील यांच्याशी संपर्क केला. आम्ही तुमची फाईल वाचली असून तुमच्याविरुद्ध प्रांत अधिकाऱ्यांनी चुकीचे निर्णय दिले आहे. तुमच्याकडून निकाल लागण्याकरीता नाशिक येथील महसूल आयुक्तांसोबत आमची ओळख आहे. त्यासाठी तुम्हाला नाशिक येथे यावे लागले असे सांगितले. त्यानंतर पुन्हा दोन ते तीन दिवसांनी पूनम पाटील हीने महिलेशी संपर्क साधून स्टॅम्प ड्यूटी भरण्यासाठी ८७ हजार रुपये ऑनलाईन मागितले. त्यानुसार वेळोवेळी कविता पाटील यांनी पूमन पाटील या महिलेच्या बँक खात्यावर ९२ हजार रुपये ट्रान्सफर केले. पैसे दिल्यानंतर महिलेने काम झाल्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी महिलेचे फोन उचलले नाही. त्यामुळे महिलेला आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. त्यांनी दि. २४ रोजी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पूनम अशोक पाटील व सोहम मिलींद जोशी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.