चाळीसगाव (प्रतिनिधी) कंपनीला ३५ कोटीचे कॉन्ट्रॅक्ट देतो, असे भासवून २० लाख रुपये अनामत रक्कम घेऊन काम न देता येथील ठेकेदाराची २१ लाख रुपयात फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात प्रवीणसिंग जयसिंग ठोके (वय ५२, रा. प्लॉट नं ४, आदर्श नगर धुळे रोड चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ८ मार्च २०२२ रोजी व दि. ११ मार्च २०२२ रोजी प्रतीत शहा व्यवस्थापकीय संचालक टेराफर्मा सुपर स्ट्रक्ट, प्रा. लि. (रा. ३०८ मिलेनियम स्टार, ढोले पाटील रोड कोरा शोरूम समोर पुणे) व एजंट दीपक कुमार मंडल (रा. चौरीचीरादभिण दक्षिण परगना पश्चिम बंगाल) यांनी संगनमताने GMR इंफ्रास्ट्रक्चरकडून निर्माण करण्यात येत असलेल्या ग्रीन फील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा गोवा येथे बांधकामाचे प्रतीत शहा यांचे टेराफर्मा सुपर स्ट्रक्ट कंपनीचे ३५० कोटी रुपये चे काम घेतले असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मेगा वाईड कंपनीकडून प्रतित शहा यांचे तेरा फर्मा कंपनीस दीड कोटीचे काम मिळालेले असताना प्रवीणसिंग ठोके यांचे रमा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 35 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट देतो असे भासवून २० लाख रुपये अनामत रक्कम घेऊन कंपनीस काम न देता वीस लाख रुपयांची तसेच दीपक मंडल याने कमिशनच्या नावाखाली एक लाख रुपयाची असे एकूण 21 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि सागर ढिकलेसो हे करीत आहेत.