निभोरा (प्रतिनिधी) इफको कंपनीच्या जाहिरातवरून रासायनिक खते पाठविण्याकरिता कंपनीकडून 30 टक्के मार्जिंन मिळेल असे आमिष दाखवून एका शेतकऱ्याची ३ लाख ७३ हजारात फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी निभोरा पोलीस स्थानकात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात गोपाल तुकाराम पाटील (वय ६५ ऐनपूर ता. रावेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ४ मे २०२२ रोजी अजय (पूर्ण नाव माहीत नाही) गोपाल पाटील यांच्या मोबाईल नंबरवर फोन करून इफको कंपनीच्या जाहिरातवरुन रासायनिक खते पाठविण्याकरिता तुम्हास 30 टक्के मार्जिन मिळेल, असे आमिष दाखवून वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने पैशाची मागणी केली. तसेच गोपाल पाटील यांनी इफको कंपनीचे एचडीएफसी बँक न्यू दिल्ली येथील कंपनीच्या खात्यावर पैसे पाठवले. तरी सुद्धा गोपाल पाटील यांना रासायनिक खताचा पुरवठा केलेला नाही. यातून गोपाल पाटील यांची ३ लाख ७३ हजार ३०० रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी निभोरा पोलीस ठाण्यात अजय (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ श्रावण कोळंबे हे करीत आहेत.