अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील एकाची मधुमेह उपचाराच्या नावाखाली पतंजलीच्या बनावट वेबसाईटवरून एकाची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, सुमित अशोक पाटील (वय ४५, रा. न्यू. प्लॉट अमळनेर) हे दि.४ फेब्रुवारी रोजी आपल्या मोबाईलवरून मधुमेह उपचारासाठी पंतजली योगपीठ हरिद्वार याठिकाणी कसे जावे, याबाबत गुगलवरून माहिती शोधत होते. यावेळी त्यांना ८९००२९६३०८ हा नंबर मिळून आला. यानंतर श्री. पाटील यांनी त्या नंबरवर फोन केला. तेव्हा त्यांना तुम्हाला आमचे प्रतिनिधी थोड्यावेळात फोन करतील असे सांगण्यात आले. थोड्यावेळात श्री. पाटील यांना ६३८०९२१० या नंबरवरून फोन आला आणि त्यानी सांगीतले की, सात दिवसाचा डायवेडीज कोर्ससाठी हरीद्वार येथे यावे लागेल. उपचारासाठी खर्च नसतो परंतू राहण्यासाठी २० हजार रुपये खर्च लागेल. यासाठी BRANCH NAME PATANJALI YOGA PEETH SANTERSHA SBI A/C NO. २०२५९६७७१८२ IFC COD.SBIN00०६१९ CIT HARIWAR पाठविला. त्यानंतर सुमित पाटील यांनी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास त्यांना २० हजार पाठवले. त्यानंतर त्यांना पुन्हा फोन आला आणि वाढीव रक्कम ३० हजार लागतील असे सांगण्यात आले. सुमित पाटील यांनी पुन्हा १३ हजार पाठविले आणि उर्वरीत रक्कम नंतर पाठवतो, असे सांगितले. सुमित पाटील यांना शंका आल्यानंतर त्यांनी अमळनेर येथील पंतजली शॉपवर जाउन सदर उपचार कोर्सबाबत विचारना केली. परंतू अशा कोणत्याही प्रकाराचा कोर्स पतंजली घेत नसल्याचे लक्षात आले. यामुळे त्यांनी अमळनेर पोलिसात ज्या अकाऊंटवर पैसे पाठवले त्या व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार भादवि कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ कलम ६६ डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार विलास पाटील हे करत आहेत.
















