जळगाव (प्रतिनिधी) महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे हुबेहूब नाव वापरून ट्रॅक्टरचे वेगवेगळे सुटे भाग विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकत कारवाई केली. याठिकाणाहून १३ हजार ६१५ रुपयांचे बनावट उत्पादने जप्त करण्यात आले. ही कारवाई दि. २५ ऑगस्ट रोजी एस.टी. वर्कशॉपसमोरील शहनशाह ट्रॅक्टर अँड अर्थ मुव्हर्स या दुकानावर करण्यात आली. या प्रकरणी दीपक नंदलाल पोपली (वय ३२, रा. गणपती नगर) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एस. टी. वर्कशॉप समोरील शहनशाह ट्रॅक्टर अँड अर्थ मुव्हर्स या दुकानात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे हुबेहूब नाव वापरून ट्रॅक्टरचे वेगवेगळे सुटे भाग विक्री केली जात होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कंपनीचे अधिकारी हंबीरराव ज्ञानू साठे (वय ६१, रा. मुंबई) यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या दुकानात कंपनीचे नाव वापरून ऑईल फिल्टर, एअर फिल्टर, कापडी हूड असे एकूण १३ हजार ६१५ रुपये किमतीचे सुटे भाग आढळून आले. या प्रकरणी दीपक पोपली याच्याविरुद्ध कॉपी राईटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि साजीद मन्सुरी करीत आहेत.