जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार व जिल्हा निरीक्षक तथा राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातील बेरोजगार तरुण व तरुणी यांना तीनचाकी रिक्षा प्रशिक्षण व लायसन्स विनामूल्य देणाच्या उपक्रमाची नाव नोंदणी दि.१ ऑगस्ट २०२२ पासून ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुरू करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा शुभारंभ १६ ऑगस्ट रोजी जळगांव येथे उपाध्यक्ष विनय भोईटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कोरोना काळात अनेक तरुण तरुणी बेरोजगार झाले असून त्यांच्या उपजीविकेकरता त्यांना रिक्षा प्रशिक्षण देऊन लायसन्स बनवून देण्याची प्रक्रिया सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात येईल. शासकीय नोकर भरती नसल्यामुळे तरुणांची परिस्थिती दोलायमान आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा रोजगार निर्माण व्हावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा प्रकारचा उपक्रम राबवून बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. तसेच रिक्षा घेणाऱ्या तरुणांना बँका वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज मिळवून देणे याकरता सुद्धा मनसे मदत करणार आहे.
रिक्षा घेणाऱ्या व्यक्तीलाच विनामूल्य प्रशिक्षण व लायसन्स दिले जाईल. प्रवासी व माल वाहतूक या रिक्षा करीता योग्य ते व्यवसायिक मार्गदर्शन सुद्धा करण्यात येईल. नांव नोंदणी मनसेच्या गणपती नगर येथील कार्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत करता येईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार तरुण आणि तरुणींनी आपले नाव नोंदवावे व विनामूल्य प्रशिक्षण घ्यावे, आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी केले आहे.