कोल्हापूर (वृत्तसंस्था) अल्पवयीन मुलीवर ६१ वर्षीय व्यक्तीने वारंवार बलात्कार करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यामध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी हातकणंगले (Hatkanangle) पोलिसांनी संशयित नंदकुमार चंद्रकांत निगवे याला अटक (Arrested) करण्यात आली आहे.
हातकणंगले इथल्या दर्गा चौक परिसरात आरोपी नंदकुमार चंद्रकांत निगवे राहतो. तो खाजगी सावकारी करतो. या सावकारीच्या माध्यमातून त्याची पीडित मुलीच्या कुटुंबाशी ओळख होती. पीडित मुलीवर अत्याचार करत असतानाही तो तिचा मानलेला मामा म्हणून समाजात वावरत होता. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार अत्याचार केले. आपल्या नवीन बांधकामावरील पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन आरोपी पीडितेवर बलात्कार करत असे. पण यातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्यावर सांगली इथे उपचार सुरु होते. यातून तिने स्त्री अर्भकाला जन्म दिला. या सगळ्या प्रकारानंतर नातेवाईकांनी सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली होती.
जी नुकतीच हातकणंगले पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे. ही तक्रार प्राप्त होताच हातकणंगले पोलिसांनी नंदकुमार निगवे याला अटक केली. अटकेनंतर त्याला तात्काळ पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. याप्रकरणी कोर्टाने संशयित आरोपीला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नंदकुमार निगवे याने खाजगी सावकारीतून अनेकांवर अन्याय केले आहेत. त्याच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी नोंद असून संतप्त ग्रामस्थांनी त्याची धिंडही काढली होती. पण असं असूनही आरोपी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करतच होता.















