अहमदनगर (वृत्तसंस्था) ‘अन्य पक्षातील फुटीर नेत्यांना मंत्रीपदे का बहाल करता’, असा संतप्त सवाल भाजपला करीत सध्याच्या राजकीय घडामोडींवर वैतागलेल्या एका मद्यधुंद तरुणाने जोरदार गोंधळ घातल्याचा प्रकार पाथर्डी येथे घडला.
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर वैतागलेल्या एका मद्यधुंद मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने भर चौकात वाहनांवर गोफणीने वार करीत सुमारे अर्धा तास गोंधळ घातला. अनेक वाहनांना अडवून चालकांना शिवीगाळ करीत त्याने हातातील पंचामध्ये दगड बांधून रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर फेकले.
‘अन्य पक्षातील फुटीर नेत्यांना मंत्रीपदे का बहाल करता, असा संतप्त सवाल भाजपला करीत या तरुणाने जोरदार गोंधळ घालत होता. हा तरुण दारूच्या नशेत असला, तरी त्याला मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या सर्व राजकीय घडामोडी चांगल्याच लक्षात होत्या. मद्यपीचा रुद्र अवतार पाहून त्याच्याजवळ जाण्याची कुणीही हिंमत केली नाही. यामुळे काही काळ चौक पूर्णपणे बंद झाल्यासारखे वातावरण निर्माण झाले होते.
हा सर्व प्रकार काही नागरिकांनी परिसरात ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलीसाच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर पोलिसांनी मद्यपी तरूणाला चौकातून बाजूला घेतले. त्याच्या हातातून गोफणीसारखा केलेला पंचा व त्यात बांधलेला दगड ताब्यात घेतला. हा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, संध्याच्या राजकीय घडामोडींचा लोकांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.