मुंबई (वृत्तसंस्था) देशातील पेट्रोल च्या किंमतीने या आधीच शंभरी पार केली असून ते रेकॉर्ड ब्रेक स्तरावर आलं आहे. त्या पाठोपाठ आता डिझेल च्याही किंमतीने शंभरी पार केली आहे. मुंबईत आज पेट्रोलच्या दरात २९ पैसे वाढ झाली असून ते १०९.८३ रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेलच्या किंमतीत ३७ पैशांची वाढ झाली असून ते १००.२९ रुपयांवर पोहोचलं आहे.
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून सलग पाचव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोल २६ ते ३० पैसे आणि डिझेल ३३ ते ३७ पैशांनी महागले आहे. तर मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोल शंभरीपार गेले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर १०९.८३ रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी १००.२९ रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०३.८४ आणि ९२.३५ रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर १८.१७ डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल ८१ डॉलर्स इतकी आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड ९० डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.