मुंबई (वृत्तसंस्था) पंजाब नॅशनल बँकेचे १३५०० कोटी रुपये कर्ज बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला अटक करण्यात आली आहे. मेहुल चोक्सी याला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. चोक्सीची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे.
पंजबा नॅशनल बँकेला मोठा गंडा घालून मेहुल चोक्सी भारतातून फरार झाला होता. त्याला परत आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असून, त्यातच बार्बुडानंतर २३ मे रोजी चोक्सी अँटिग्वातून फरार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्याचा शोध घेतला जात होता. जानेवारी २०१८ पासून तो तेथे राहत होता अशी माहिती कॅरेबियन बेटावरील रॉयल पोलीस दलाने दिली होती. चोक्सी फरार झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनीही बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, चोक्सी डोमिनिकामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सीआयडीने कारवाई करत त्याला अटक केली. सध्या तो सीआयडीच्या कोठडीत आहे.
चोक्सीला अटक झाल्यानंतर त्याचे वकील विजय अग्रवाल यांनीही याबद्दलची माहिती दिली. “मी त्यांच्या कुटुंबीयांशी बोललो आहे. चोक्सी सापडल्यामुळे कुटुंबीय आनंदात आहेत आणि चोक्सीच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. डोमिनिकामध्ये कसं घेऊन जाण्यात आलं, याची माहिती घेण्यासाठी चोक्सीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असं अग्रवाल म्हणाले.