जळगाव दि.२४ प्रतिनिधी – सध्याच्या भौतिक जगात आपण वस्तू संग्रहाच्या मागे लागलो आहोत, मिळाले नाही तर आपण दुःखी होतो मात्र आपल्या जवळ जे आहे ते इतरांना दिल्याने आपण आनंदी व्हाल आणि हेच गांधी विचारांचे मूळ आहे असे प्रतिपादन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे परीक्षा नियंत्रक गिरीश कुळकर्णी यांनी केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशन, कर्नाटक गांधी स्माNEरक निधी व बंगलोर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेच्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर बंगलोर विद्यापीठाचे कुलसचिव शेख लतीफ, एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. रमेश एस. कित्तुर, समन्वयक डॉ. अबिदा बेगम व कर्नाटक गांधी स्मारक निधीचे कोषाध्यक्ष एच. व्ही. दिनेश होते.
गिरीश कुळकर्णी पुढे म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनातून स्वावलंबन, सत्याचा आग्रह, शांती व प्रेमभाव घेतला पाहिजे. आपण महापुरुषांच्या जीवनातून जे शिकतो व समजतो त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. सामाजिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी पुढाकार घेतल्यास समाज आपल्या पाठीशी उभा राहतो. त्यांनी कन्नड भाषेतून भाषणास सुरुवात करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधीजींना पुष्प वंदना करुन व झाडाला पाणी घालून करण्यात आली. डॉ. अबिदा बेगम यांनी प्रास्ताविक केले. उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना कुलसचिव शेख लतीफ यांनी ‘चांगला माणुस ही देशाची संपत्ती असून आपला परीक्षेतील सहभाग ही चांगला माणुस घडण्याची प्रक्रिया आहे’ असे म्हटले. कार्यक्रमाधिकारी प्रा. रमेश कित्तुर यांनी विद्यार्थ्यांनी रिल्स मागे न लागता गांधी विचारांच्या मागे लागले पाहिजे. अहिंसा हे ताणतणावावरील रामबाण औषध आहे. अध्यक्षीय मनोगतात एच. व्ही. दिनेश यांनी मोबाईलचा विवेकी वापर, योग्य-अयोग्य याची निवड तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल असे म्हटले.
भोजनोत्तर सत्रात कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाचे सह-संचालक डॉ. रामकृष्ण रेड्डी, बंगलोर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या व साहित्यिक डॉ. शरीफा, कर्नाटक गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष वुडी कृष्णा यांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तर समन्वयक शिक्षकांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन सतिशकुमार के. आर. व डॉ. संतोष यांनी केले.