जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या दोन गुन्हेगारांच्या टोळीला जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. आशुतोष उर्फ आशु सुरेश मोरे (21, रा.एकनाथ नगर रामेश्वर कॉलनी) व दीक्षांत उर्फ दादू देविदास सपकाळे (19, यादव देवचंद हायस्कूल जवळ मेहरुण) असे हद्दपार संशयिताची नावे आहेत.
जळगाव शहरात व जिल्ह्यात ठिकठिकाणी दहशत पसरवून नागरीकांमध्ये भीतीचे निर्माण वातावरण तयार करण्याचे काम हे दोन्ही गुन्हेगार करत होते. त्यांच्यावर एमआयडीसी व शनीपेठ पोलिसात गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल असल्याने त्यांना हद्दपार करण्याबाबत एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सय्यद, साईनाथ मुंडे, जमील शेख, इम्तियाज खान यांच्या माध्यमातून हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील व सहकार्यांनी अवलोकन करून हा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे सादर केल्यानंतर संशयितांना दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश मंजूर करण्यात आले.