नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजधानी दिल्लीत देशाला हादरवणारी घटना घडली. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका विवाहीत महिलेवर सामूहिक बलात्कार (Delhi Woman Raped) करून तिचे केस कापण्यात आले. इतकेच नाहीतर तिला चपलांचा हार घालून रस्त्यावर फिरायला लावले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) चार महिलांना अटक केली आहे.
राजधानी दिल्लीतील कस्तुरबा नगरमध्ये महिलेसोबत भयंकर वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका २० वर्षीय विवाहित महिलेला पकडून गर्दीत तिचा विनयभंगही करण्यात आला. या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पकडून तिचे मुंडन करण्यात आले. एवढेच नाही तर तिच्या तोंडाला काळे फासण्यात आले आणि चपलांचा हार घालून रस्त्यावर धिंड काढली. महिलेच्या लहान बहिणीने पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिला वाचवले. तिचे समुपदेशन केले जात आहे. बहिणीच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कार आणि इतर कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. महिलेसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली चार महिलांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणामुळे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल संतापल्या आहेत. त्यांनी पीडितेची भेट घेऊन तिच्याशी बोलून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली. ‘कस्तुरबा नगरमध्ये अवैध दारू विक्रेत्यांनी २० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला, तिचे मुंडन केले, चपलांचा हार घालून, तोंडाला काळेपासून तिची धिंड काढली. दिल्ली पोलिसांना नोटीस बजावत आहे. सर्व गुन्हेगार स्त्री-पुरुषांना अटक करून पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्यात यावी, असे मालीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पूर्ववैमनस्यातून महिलेसोबत हे वर्तन केल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित महिला विवाहित आहे. तिला एक मूलही आहे. शेजारी राहणारा एक मुलगा आपल्या बहिणीच्या मागे पडला होता. नंतर त्या मुलाने १२ नोव्हेंबरला आत्महत्या केली होती. आपल्या बहिणीमुळेच मुलाने आत्महत्या केल्याचे मुलाच्या कुटुंबीयांना वाटते आहे, असे पीडितेच्या बहिणीने म्हटले आहे. मुलाच्या आत्महत्येनंतर ही महिला भाड्याने राहत होती.
















