नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा काल हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. जेव्हा अपघात झाला तेव्हा काही काळ जनरल बिपीन रावत जिवंत होते. यासंदर्भात बचाव पथकातील एका सदस्याने ही माहिती दिली आहे. अपघातानंतर जेव्हा रावत यांना हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले तेव्हा त्यांनी हिंदीत आपले नावही सांगितले.
हेलिकॉप्टर अपघातानंतर आम्ही दोन जणांना जिवंत वाचवलं. त्यापैकी एक सीडीएस रावत होते. आम्ही त्यांना बाहेर काढताच ते संरक्षण कर्मचाऱ्यांशी खालच्या आवाजात हिंदीत बोलले आणि त्यांचे नाव सांगितले. रुग्णालयात नेत असतानाच त्यांनी प्राण सोडले. रुग्णालयात नेण्यात आलेल्या आणि सध्या उपचार सुरू असलेल्या दुसऱ्या व्यक्तीची तातडीने ओळख पटू शकली नाही, असं अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेले वरिष्ठ अग्निशमन अधिकारी आणि बचाव कर्मचारी एन. सी. मुरली म्हणाले.
आपल्या शरीराच्या खालच्या भागात गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यानंतर त्यांना चादरीत गुंडाळून रुग्णालयात नेण्यात आले, असे मुरली यांनी सांगितले. दुर्घटनाग्रस्त परिसरात बचाव कार्यात बचाव पथकाला अडचणींचा सामना करावा लागला. अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब आणण्यासाठी घटनास्थळी कोणताही रस्ता नव्हता. यामुळे आम्हाला जवळच्या नदीतून आणि घरांमधील भांड्यांमधून पाणी आणावे लागले. ऑपरेशन खूप कठीण होते. कारण आम्हाला जखमींना वाचवण्यासाठी किंवा मृतदेह बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरचे तुकडे बाजूला करावे लागले, असे मुरली म्हणाले.
दुर्घटनेत उन्मळून पडलेले झाड कापावे लागले. या सर्वांमुळे आमच्या बचाव कार्यात विलंब झाला. आम्ही १२ मृतदेह बाहेर काढले. गंभीर भाजलेल्या दोघांना जिवंत बाहेर काढण्यात आले. नंतर भारतीय हवाई दलाचे जवान अर्ध्या रस्त्यात बचाव कार्यात सहभागी झाले. टीमला हेलिकॉप्टरचा अपघात झालेल्या ठिकाणी नेले. ढिगाऱ्यांमध्ये शस्त्रेही पडली होती. त्यामुळे आम्हाला सावधगिरीने काम करावे लागले, अशी माहिती मुरली यांनी दिली.