मुंबई (वृत्तसंस्था) बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विटंबना केल्याप्रकरणी महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. शिवराय सगळ्या देशाचे दैवत आहे. हिणकस आणि विकृत प्रवृत्तीचा बिमोड करा. आता क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल घ्यावी, असं मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटीत घडले आहे, तर त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका. गेले कित्येक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि आता तर शिवरायांसारख्या आपल्या आराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते हे दुर्दैवी आहे.”
नुकतेच वाराणसीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले असे कौतुकोद्गार काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच, भाजप शासित कर्नाटकात याच शिवरायांची विटंबना होते आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
राज्यात कुणाचेही सरकार असो पण दैवते बदलत नाहीत. हा कानडी अत्याचार बंद करण्यासाठी आता पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने तेथील राज्य सरकारला आदेश द्यावेत व या विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यास सांगावे,” अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.