पहूर, ता. जामनेर (प्रतिनिधी) तोरनाळा गावाजवळील पठारतांडा फाट्यावर एक कथित भुतांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी पहूर पोलिसांनी तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तोरनाळाजवळील पठारतांडा येथे शिर नसलेला मुलगा आणि महिला रस्त्यावर उलटया पावली चालत असल्याचा व्हीडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला पहूर पोलिसांनी देऊळगाव गुजरी येथील रहिवासी जमील शहा, गोपाल तवर व सतिश शिंदे यांना शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले आणि चौकशी करुन सोडून दिले. पोलीस या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहत आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचाही अभ्यास या प्रकरणात सुरु आहे. व्हिडीओ बनविण्याचा उद्देश काय याचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ मिक्सिंग करून कुणी तरी सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याचा जवाब संबधित तीनही जणांनी पोलिसांना लिहून दिला आहे.