जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महानगरपालिका मालकीच्या २३ व्यापारी संकुलातील १६ अविकसित व अव्यवसायिक क्षेत्रातील मुदत संपलेल्या २६०८ गाळे धारकांना न्याय द्यावा, अशी मागणी ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांनी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जळगाव महानगरपालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील २६०८ गाळ्यांची भाडे मुदत २०१२ पासून संपली असून नवीन करारनुसार महानगरपालिका प्रशासनाने लाखो रुपयांच्या भाडे वसुलीबाबत संबंधित गाळे धारकांना नोटीस पाठविल्या आहेत. त्यामुळे गेल्या ४ महिन्यांपासून सदर गाळे बंद असून व्यापारांनी दुकान बंद आंदोलन पुकारले आहे.
ज्या दुकानाचे वार्षिक भाडे ६ हजार रुपये होते. त्या गाळेधारकाला आता वार्षिक १ लाख ५० हजार रुपये वार्षिक भाडे आकारणी करून दहा वर्षाच्या फरकाची १५ लाख रुपये ते २० लाख रुपये फरकाची रक्कम वसुलीची नोटीस पाठविली आहे.
निवेदनात म्हंटल आहे की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमूळे सर्व प्रकारचे व्यवसाय ठप्प आहेत. व्यापार जवळपास बंद आहे. सततच्या लॉकडाऊन मूळे व्यापारी त्रस्त आहे. अशा परिस्थितीत एवढी मोठी रक्कम कोणताही व्यापारी भरू शकत नाही. वास्तविक सदर दुकाने अविकसित क्षेत्रात आहे. मुख्य बाजार पेठेपासुन खुप लांब अशा भागात आहे. मात्र शासन निर्णयाच्या रेडी रेकनरचा संदर्भ देवुन अशी पठाणी वसुली महानगरपालिका प्रशासन करीत आहे, हे अतिशय अन्यायकारक आहे.
अविकसित क्षेत्रातील व्यापारी संकुलातील दुकांनांना रेडी रेकनर दर जो ८% लावला आहे. तो न लावता २% दर लावावा, तसेच याबाबत तातडीने लक्ष घालावे व जळगाव शहरातील २६०८ मराठी व्यापारी गाळेधारक व त्यांच्यावर निर्भर हजारो परीवार यांना न्याय द्यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना गाळेधारकांना सोबत घेवुन मनसे स्टाईल आंदोलन करून न्याय मिळवून देईल.