मुंबई (वृत्तसंस्था) देशात आणि राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच देशात ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटरच्या तुटवड्यामुळे रूग्णांचा तडफून मृत्यू होत आहे. याच दरम्यान क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मदतीला धावला आहे. सचिन तेंडूलकरने मिशन ऑक्सिजन या मोहिमेसाठी १ कोटी रुपयांची मदत केली आहे.
सचिन तेंडूलकरने मिशन ऑक्सिजन या मोहिमेसाठी १ कोटी रुपयांची मदत केली आहे. २५० उद्योजक तरूणांनी सुरू केलेल्या या मोहिमेत सचिनने सहभाग घेतला आहे. यापूर्वी गेल्या वर्षीही सचिनने अशीच मदत केली होती. तेव्हा त्याने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी दिला होता. मिशन ऑक्सिजन मोहिमेसाठी एक कोटी रुपयांची मदत करत असल्याची माहिती सचिनने ट्विटरद्वारे दिली. तसेच, “मी खेळत असताना तुमच्याकडून मिळालेला पाठिंबा अमूल्य होता, त्यामुळे मी यश मिळवू शकलो. आज आपण कोरोनाविरोधात लढणाऱ्यांच्या मागे ठामपणे उभं राहण्याची आणि त्यांना पाठिंबा देण्याची वेळ आहे”, अशा आशयाचा संदेशही यावेळी त्याने दिला आहे.