जळगाव (प्रतिनिधी) शहराच्या निवृत्तीनगर भागात अज्ञात चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करत सुमारे ८८ हजार २७० रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुरुवारी २१ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र जिजाबराव पाटील (वय ३६, रा. निवृत्तीनगर) हे व्यापारी असून, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेपासून ते १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान त्यांचे घर बंद होते. याच कालावधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पाटील यांच्या घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप कोणत्यातरी साधनाने तोडले. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी सुमारे ८८ हजार २७० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेले. चोरीची घटना लक्षात येताच जितेंद्र पाटील यांनी २० नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली. यावरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. उपनिरीक्षक उल्हास चहाटे पुढील तपास करत आहेत.















