चाळीसगाव (प्रतिनिधी) एसटी महामंडळाच्या बसमध्ये भडगाव ते चाळीसगाव प्रवास दरम्यान एका महिलेच्या बॅगमधून तब्बल २ लाख ३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात शोभा शिवाजी पाटील (वय ५३, रा. N९, घर नं ३११ रायगड नगर सिडको, औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १६ एप्रिल २०२२ रोजी शोभा पाटील यांच्या शेजारी बस मध्ये बसलेली सुमारे ३० ते ३५ वयाची सडपातळ बांधा असलेली व सावळ्या रंगाची, अंगात फिकट हिरवा रंगाची साडी नेसलेली अश्या वर्णनाच्या अनोळखी महिलेने बॅग मधिल १ लाख ३० हजार रुपये किंमतीची ४ तोळे सोन्याची गंठण पोत, ६३ हजार रुपये किंमतीचे ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे २ कानातील तोंगल, १० हजार ५०० रुपये किंमतीचे ३.५ ग्रॅम वजनाचे दोन कानातील तोंगल, असा एकूण २ लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल संमतीवाचुन लबाडीच्या इराद्याने चोरुन नेला आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहेत.