मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शुक्रवारी अक्षय्यतृतीयेचा सोने खरेदीचा शुभमुहूर्त टळला गेला. त्यामुळे राज्यातील सराफा व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे समजते. सोन्या-चांदीची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी नसल्याने फक्त मुंबईतील सोने बाजाराचे जवळपास ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला.
गेल्या वर्षीही पाडवा आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर टाळेबंदी असल्याने बाजारपेठा बंद होत्या. त्यानंतर व्यापार- उद्योगांना परवानगी मिळाल्याने सोने व्यापारालाही गती येईल असा अंदाज बांधण्यात आला होता. त्यात सोन्याचे दरही कमी होऊ लागले. परंतु कठोर निर्बंधांमुळे सोने-चांदी दुकानांना आणि मोठ्या बाजारपेठांना फटका बसला आणि या व्यापाऱ्यांपुढे मोठे अर्थसंकट निर्माण झाले. दरवर्षी सणांच्या मुहूर्तांवर कोट्यवधी रुपयांची उलाढाल या बाजारात होते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनेखरेदी करणे हा ग्राहकांच्या श्रद्धेचाही भाग असतो. गेली काही वर्षे सोन्याचे भाव चढे असूनही सराफ बाजार अक्षय्यतृतीयेच्या दिवशी उजळला होता. मात्र यावर्षी भाव कमी होऊनही उलाढाल ठप्प झाली आहे. फक्त मुंबईचा विचार करता जवळपास ८०० कोटी रुपयांचा व्यवसाय यंदा झाला नसल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति औंस १८३४ डॉलर इतका होता. त्याचबरोबर चांदीचा भाव प्रतिऔंस २७.२० डॉलर इतका आहे. HDFC सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, कॉमेक्स (न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंज) मधील रिकव्हरीमुळे दिल्ली सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे भाव १४६ रुपयांनी वधारले. भारतात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सोन्याच्या किमती वाढल्या होत्या.
















