मेलबर्न (वृत्तसंस्था) ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये वास्तव्यास असलेल्या डेव्हिड हॉल नावाच्या व्यक्तीने सोनं समजून १७ किलोचा दगड लपवून ठेवला होता. या दगडात सोनं आहे की नाही हे माहिती करून घेण्यासाठी डेव्हिड मेलबर्नमधील संग्रहालयात पोहोचले. तज्ज्ञांनी दगडाची पाहणी केली असता हा दगड सोनं नसून अंतराळाची यात्रा करून आलेलं उल्कापिंड होतं. त्याची किंमत सोन्यापेक्षा जास्त असल्याचं त्या व्यक्तीला समजलं. त्यामुळे त्यांना अत्यानंद झाला.
लाल आणि पिवळ्या रंगाचा दगड डेव्हिड यांना २०१५ मध्ये मेलबर्नमध्ये असलेल्या रिजनल पार्क परिसरात मिळाला. १९ व्या शतकात या भागात सोन्याचे अनेक दगड वाहून आले होते. त्यामुळे या भागात सोनं सापडेल अशी आशा अनेकांना असते. आपल्याला सोन्याचा दगड मिळाल्याचं डेव्हिड यांना वाटलं होतं. त्यांनी सोनं मिळवण्यासाठी दगड फोडण्याचे प्रयत्न केले. मात्र हाती काहीच आलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडे असलेला दगड रहस्य बनून राहिला.
काही दिवसांपूर्वीच डेव्हिड त्यांच्याकडे असलेला दगड घेऊन मेलबर्नमधील संग्रहालयात गेले. भूवैज्ञानिक डेरमोट हेन्री यांनी दगडाचं परीक्षण केलं. डेव्हिड यांच्याकडे असलेला दगड उल्कापिंड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. उल्कापिंड ४.६ अब्ज वर्षे जुनं असून ते १०० ते १ हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोसळलं असावं, असा अंदाज हेन्री यांनी वर्तवला.














