जळगाव (प्रतिनिधी) सोने व चांदीने आतापर्यंतचा सर्वाधिक दर गाठला आहे. बुधवारी जळगावात एक तोळा सोने ६१ हजार ९०९ रुपयांना तर किलोभर चांदीसाठी ७५ हजार ७०५ रुपये मोजावे लागले आहेत. मजबूत जागतिक ट्रेंड दरम्यान सराफा बाजारात १० ग्रॅम सोने महाग झाले आहे आणि ६१,०८० रुपयांवर पोहोचले आहे. यासह सोन्याने नवा उच्चांक गाठला. यात आगामी आठ ते दहा दिवसात आणखी वाढ होण्याचे संकेत असून सोन्याचा दर ६५ हजारांवर तर चांदी ८० हजारावर पोहचेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
सुवर्ण बाजाराच्या इतिहासात प्रथमच बुधवारी सोने ६१ हजारावर पोहोचले तर चांदीने गगनभरारी घेत ७५ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता मोठी असून सोने ६५ हजारांच्या पुढे तर चांदी ८० हजारावर पोहचू शकते, असे सराफ बाजार असोसिएशनचे अध्यक्ष अजय ललवाणी यांनी सांगितले. गेल्या पाच दिवसात सोने व चांदीच्या दरात चढ-उतार सुरू होता. दरम्यान सोमवारी सोने ३०० रुपये तर चांदी २०० रुपयांनी घसरली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी चांदीचे दर २०० रूपयांनी घसरले. मात्र मंगळवारी सोन्यात तब्बल ६५० रूपयांनी वाढ झाली. हा वाढीचा आलेख बुधवारी देखील कायम राहिला. विशेष म्हणजे चांदीचा भावही १,८१० रुपयांनी वाढून ७३,९५० रुपये प्रति किलोवर बंद झाला. परदेशी बाजारात सोने आणि चांदीचे भाव अनुक्रमे २,०२७ डॉलर प्रति औंस आणि २४.०४ डॉलर प्रति औंस होते.