मुंबई (वृत्तसंस्था) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केल्यानंतर जगभरातील बाजारांत त्याचा परिणाम दिसून येत आहे. बिथरलेल्या गुंतवणूकदारांनी शाश्वत मूल्य असणाऱ्या सोन्यातील गुंतवणुकीकडे वळण घेतले. त्याचा थेट परिणाम म्हणून सोन्याचे मूल्य २०२२ सालात प्रथमच तोळ्यामागे ५२ हजारांपुढे गेले.
भांडवली बाजार निर्देशांकांनी गमावले, त्यापेक्षा अधिक मौल्यवान धातूतील तेजीने गुरुवारी कमावले. सराफ बाजारात स्टँडर्ड सोन्याचे घाऊक दर तोळ्यामागे ५२,३३० रुपयांवर बंद झाले, तर शुद्ध सोन्याने ५२,५४० रुपयांचा दर गाठला. बुधवारच्या तुलनेत हे दर तोळ्यामागे ९३० रुपयांनी वाढले. चांदीचे मूल्यही किलोमागे ६८,१५० रुपये अशा उच्चांकपदाला पोहोचले. आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात सोने १.८ टक्क्यांनी वाढून प्रति औंस १,९४० डॉलरवर गेले आहेत, तर ‘एमसीएक्स’वर सोन्याच्या एप्रिलसाठी वायदा किमती २.३४ टक्क्यांनी वाढून ५१,५५८ रुपयांवर गुरुवारी पोहोचल्या.