भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील गोंडगाव येथील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह मंगळवारी कडबा कुट्टीखाली आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलीसांकडून तपासचक्र वेगाने फिरवायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीचा बळी हा नरबळी की लैंगिक अत्याचारामुळे झाला, अशा वेगवेगळ्या चर्चा गावात सुरु आहेत. परंतू शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाला खरी दिशा मिळणार आहे. दुसरीकडे मयत बालिकेच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर आक्रोश करत ठिय्या आंदोलन केले. यात बालहत्येचा न्याय मिळाला पाहिजे, यातील आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी करण्यात आली.
नेमकं काय आहे प्रकरण !
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे येथील अल्पवयीन मुलगी ३० जून रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. बेपत्ता अल्पवयीन मुलीचा पोलिस प्रशासनाकडून शोध सुरू असतानाच १ ऑगस्टला या अल्पवयीन मुलीचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या मोकळ्या जागेत कडबा कुट्टीखाली आढळून आला होता. या घटनेबाबत खुनाचा गुन्हा दाखल करा व सशयित आरोपींचा शोध घेऊन आरोपींना तत्काळ अटक करा, बालहत्येला न्याय द्या, या मागणीसाठी गोंडगाव येथील बालिकेच्या आईसह २५० ते ३०० ग्रामस्थांनी आक्रोश करत ठिय्या आंदोलन केले.
बालिकेवर शोकाकूल वातावरणात अंतिमसंस्कार !
बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मृत बालिकेची पोलिस बंदोबस्तात अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत शेकडो ग्रामस्थ सामील झाले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किसनराव पाटील, पो.नि. राहुल खताळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर, पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाळे तसेच भडगाव, पाचोरा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यासह चाळीसगाव उपविभागातील ३ अधिकाऱ्यांसह २५ कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. बालिकेवर रात्री शोकाकूल वातावरणात करण्यात आले.
आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका !
अल्पवयीन मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथे पाठवण्यात आला होता. दरम्यान, जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाहीत, अशी भूमिका मुलीच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी घेतली होती. या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांची समज काढल्यानंतर मुलीवर गोंडगाव येथे रात्री ७.३० वाजेच्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, पो.नि. राहुल खताळ यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त होता. तर भडगाव पोलीस ठाण्यात ठाण मांडून अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किसनराव पाटील या तपासाला गती दिली आहे.
तात्काळ चौकशी करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश !
बालिका मृत्यूप्रकरणात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ चौकशी करून आरोपींना अटक करण्याचे निर्देश अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे यांना दिले आहेत. या घटनेची माहिती कळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.