चाळीसगाव (प्रतिनिधी) अवर्षणप्रवण चाळीसगाव तालुक्याने मागील वर्षी मोठ्या दुष्काळाचा सामना केला, मात्र अश्या परिस्थितीत लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाकडून ३०० कोटींहून जास्त अनुदान, पीकविमा व दुष्काळी उपाययोजना निधी मिळवून देत शेतकऱ्यांना आधार दिला. त्यामुळे तालुक्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना शेतीला पाण्याचा हक्काचा स्त्रोत मिळावा यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मागेल त्याला १०० टक्के अनुदानावर विहीर व शेततळे देण्याची घोषणा चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केली. ते पंचायत समिती चाळीसगाव द्वारा छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे आयोजित रोजगार हमी व मोदी आवास योजना आढावा बैठक प्रसंगी बोलत होते.
यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, माजी सभापती संजय भास्कराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, माजी जि प सदस्य किशोर पाटील, माजी नगरसेवक, आनंद खरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत बाविस्कर, शैलेंद्रसिंग पाटील, प्रदीप पाटील, काकासाहेब माळी, भाऊसाहेब पाटील, सुभाष पाटील, धनंजय मांडोळे, बबन पवार, अमोल चव्हाण, रोहन सूर्यवंशी, नितीन चौधरी, अतुल पाटील, यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, विकासो संचालक, शेतकरी, पंचायत समिती व रोजगार हमी योजना विभागाचे कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मंगेशदादा यांनी मनोगतात सांगितले कि, राज्य शासनाने विहिरीसाठी ५ लक्ष तर शेततळे साठी ७ लक्ष असे भरघोस अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेत सर्वांनी येत्या २५ तारखेपर्यंत आपला प्रस्ताव तयार करून ग्रामपंचायतीकडे जमा करावे, प्रकरण मंजूर करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी कुणालाही एक रुपया देऊ नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच मोदी आवास योजनेतून तालुक्यातील उर्वरित ओबीसी लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी जास्तीत जास्त प्रस्ताव जमा करून त्याला मंजुरी द्यावी अश्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून रोजगार हमी योजना व आवास योजनेचा आढावा सर्वांसमोर मांडला. मागेल त्याला विहिरी व शेततळे याची अमलबजावणी करण्यासाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामपंचायतीने लेबर बजेट तयार करावे व त्याला मंजुरी देण्याची कार्यवाही करावी असे निर्देश दिले. डार्क झोन असणाऱ्या गावात सामुहिक विहीरी देण्यात येतील अशी माहिती दिली