पुणे (वृत्तसंस्था) पावसाची (Rainfall) आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी मान्सून (Monsoon) वेळेआधीच धडकणार आहे. येत्या 27 मे रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. तसेच राज्यात देखील १ जून रोजी पावसाचे आगमन होणार आहे.
राज्यात साधारणपणे मान्सून ७ किंवा ८ जून रोजी तळकोकणात दाखल होतो; पण यंदा त्यापूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. उत्तरेकडे सरकताना मान्सूनचा वेग मंदावतो. मात्र, मान्सूनच्या प्रवासात सध्या तरी कोणतेही अडथळे दिसत नाहीत. त्यामुळे तो किमान सहा दिवस लवकर राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
येत्या आठवड्यात वळवाची शक्यता
विभागाने मे महिन्याच्या दिलेल्या अंदाजानुसार देशात पाऊस जास्त असण्याची शक्यता आहे. मात्र, आतापर्यंत तसा पाऊस झालेला नाही. दक्षिणेकडील राज्यांत तो जोरदार कोसळला आहे. मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात कोकण, दक्षिण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशात सरासरीच्या ९९% पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्याचा अंदाज मे अखेरीस येण्याची शक्यता आहे. त्यात सबंध देशात पावसाचे वितरण कसे असेल याचा अंदाज दिला जाईल. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.