मुंबई (वृत्तसंस्था) आज गुगल आपल्या खास डूडलद्वारे स्त्रीवादाचा एक महत्त्वाचा चेहरा असलेल्या फातिमा शेख यांची जयंती साजरी करत आहे. फातिमा शेख यांच्याकडे भारतातील पहिली मुस्लिम महिला शिक्षिका म्हणून पाहिले जाते. फातिमा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या समाजसुधारकांच्या काळातील आहे आणि १८४८ मध्ये भारतातील पहिली फक्त मुलींची शाळा उघडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
याच त्या फातिमा- ज्यांनी सावित्रीबाईंसोबत स्त्री शिक्षणाचे काम केले. महात्मा फुले आणि सावित्रीआई यांनी अस्पृश्य मुले आणि मुलींसाठी शाळा सुरू केली, तेव्हा त्यांना जागा दिली ती उस्मान शेख यांनी. फातिमा ही उस्मानची बहीण. ती सावित्रीआईंच्या संपर्कात आली आणि सावित्री होऊन गेली. तिनेही शेणगोळे खाल्ले, बदनामीचा मुकाबला केला. पण, ती डगमगली नाही. स्वतः शिकली. दलित मानल्या गेलेल्या जातीतील मुलांना, मुलींना शिकवत राहिली. साऊंसोबत काम करत राहिली.
एक लक्षात घ्या. ज्योतिराव-साऊ १८४८ मध्ये भिडेवाड्यात शाळा सुरू करतात, तेव्हा पुढच्या प्रकल्पांसाठी त्यांना उस्मान जागा देतो. फातिमा सोबत असते. १८५१-५२ मध्ये ज्या शाळा सुरू होतात, त्याची फातिमा सहसंस्थापक असते. तिकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडच्या सत्याग्रह परिषदेसाठी फत्तेखान जागा देतो. २५ डिसेंबर १९२७ या दिवशी महाडमध्ये सत्याग्रह परिषद सुरू झाली. हजारो लोक त्यासाठी आले. प्रचंड मिरवणूक निघाली. चवदार तळ्याला वेढा घातला गेला. ‘मनुस्मृती’चे दहन झाले ते २५ डिसेंबरलाच. या परिषदेला जागा मिळू नये, यासाठी स्पृश्य नेत्यांनी गावक-यांना बजावले- धमकावले होते. त्यामुळे जागा मिळेना. पण, फत्तेखान जागचा हलला नाही. ‘दिलेले वचन मी कधीही मोडणार नाही’, असे सांगून त्याने या लोकांना हाकलले आणि सत्याग्रहाला जागा दिली.
हा उस्मान, हा फत्तेखान, ही फातिमा आपल्या भावविश्वात का नाही? फुले-शाहू-आंबेडकरांचा नारा देणा-या चळवळींना अद्यापही या चौथ्या कोनाचे भान नाही. त्या आता आपल्याच हितसंबंधांमध्ये मग्न आहेत. भवतालाचे व्यापक भान या चळवळींना कसे नाही? जातीतील तेढ वाढली की तोडगा धर्मावर निघतो. धर्मांधांचे हे कारस्थान वेळीच ओळखले पाहिजे. सगळ्या जातींना धुमसत ठेवायचे आणि तिकडे हिंदू-मुस्लिम असा तणाव वाढवायचा. सगळ्याच धर्मांचा उन्माद वाढवणारे वातावरण तयार करायचे, असा हा डाव आहे. त्याची सुरूवात झाली आहे.
हा विखार भयंकर म्हणजे भयंकर टोकाला गेला आहे. एखादी ठिणगीही विक्राळ आग लावू शकेल, अशा टोकाला. फुले-शाहू-आंबेडकरांसोबत फातिमा-फत्तेखान घेतले नाहीत, तर आगामी काळ कठीण असणार आहे. चळवळींनी ‘कम्फर्ट झोन’ सोडून आपली रणनीती बदलण्याची ही वेळ आहे, एवढेच इथे नोंदवतो.