नाशिक (वृत्तसंस्था) सेपकटकरा खेळाच्या नाशिक जिल्हा संघाकडून खेळल्याचे बोगस प्रमाणपत्र मिळवून नगरच्या शासकीय कोषागारात एकाने २०१९ मध्ये सरकारी नोकरी मिळवली होती. परंतू दोन वर्षांनी हे बिंग फुटले आणि प्रभाकर धोंडीबा गाडेकर या तोतया खेळाडूला पुण्यातील हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, आरोपी गाडेकर याने २०१९ मध्ये अहमदनगरच्या शासकीय कोषागारात सरकारी नोकरी मिळवली होती. त्याला पुण्यातील हिंडवडी येथे अटक करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंनी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे. आरोपीनं क्रीडा आरक्षणाचा लाभ उठवल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
आरोपी गाडेकरने देखील अशाच गैरमार्गाचा अवलंब करत ‘सेपकटकरा’ खेळाच्या नाशिक जिल्हा संघाकडून खेळल्याचं बोगस प्रमाणपत्र मिळवलं होतं. विशेष म्हणजे नाशिकच्या सेपकटकरा जिल्हा संघात फक्त पाच खेळाडू मागील कित्येक वर्षापासून जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत आहेत. असं असताना दुसरं कोणीतरी आपल्या संघाचं प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरीवर लागल्याचं संबंधित खेळाडूंना समजलं. त्यानंतर संबंधित खेळाडूंनी ही गोष्ट क्रीडा आयुक्तांच्या कानावर घातली. याप्रकरणी पाठपुरावा केल्यानंतर संबंधित कारवाई केली आहे. सेपकटकरा हा दुर्लक्षित क्रीडा प्रकार असून खूप कमी प्रमाणात खेळला जातो. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.