नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जवळपास दोन महिने झाले आहेत, आम्ही थंडी वातावरणाने त्रस्त आहोत व मरत आहोत. मात्र सरकार केवळ ‘तारीख पे तारीख’ करत आहे आणि गोष्टी ताणत आहे, जेणेकरून आम्ही कंटाळून इथून निघून जावं.” हे त्यांचं षडयंत्र आहे. असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मोल्ला यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास ५० दिवसांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. मात्र, या प्रकरणी अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोलन सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयाने याकडे लक्ष देत चार सदस्यीय समितीची देखील नेमणूक केली आहे. मात्र या समितीसमोर जाण्यास आंदोलक शेतकऱ्यांनी नकार दर्शवला आहे. शेतकरी संघटना कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तसेच, सरकारचं केवळ ‘तारीख पे तारीख’ असं सुरू आहे आणि शेतकरी कंटाळून निघून जावेत म्हणून गोष्टी ताणल्या जात आहेत. असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मोल्ला यांनी केला आहे.