पाटना(वृत्तसंस्था) बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून नितीशकुमार सरकार कोसळलं आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपपासून अधिकृतपणे फारकत घेतलीय. नितीशकुमार हे आज दुपारी राज्यपाल फग्गु चौहान यांची भेट घेवून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत नव्या आघाडी सरकारच्या स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, नितीशकुमार यांच्या या भेटीपूर्वी भाजपच्या १६ मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
या मंत्र्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला असून नितीशकुमार सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे पत्रही दिले आहे. उद्या किंवा परवा (बुधवार) नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. नितीशकुमार आणि भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे. महिन्याभरातील घडामोडींवर नजर टाकल्या नितीश आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल सुरु असल्याचे दिसून येत नाही. नितीश कुमार यांनी एका महिन्यापासून भाजपपासून अंतर ठेवले आहे. त्यामुळे नितीश कुमार आणि भाजपमध्ये काडीमोड होवून बिहारमध्ये ११ ऑगस्टपूर्वी एनडीएचे सरकार पडेल आणि नितीश पुन्हा राजदसोबत सरकार स्थापन करतील असे अंदाज बांधले जात होते. बिहारमध्ये सध्या सुरू असलेला राजकीय गोंधळ आणि विविध पक्षांच्या महत्त्वाच्या बैठकीदरम्यान नव्या सरकारची तयारी जवळपास पूर्ण झालीय. ताज्या अपडेटनुसार, काँग्रेस-डाव्या पक्षांनी आपल्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तेजस्वी यांना सुपूर्द केलंय.